माध्यमिक विभाग
उत्तम शाळेचे मुलाधार म्हणजे शिक्षक, विद्यार्थी व पालक! या विचाराने आपणही या घटकांचा विकास, विचार महत्वाचा मानतो.
विद्यार्थांचा उत्साह, धाडस,आत्मविश्वास,जिद्द यांना वळण लावण्याचे सामर्थ्य शिक्षकाकडे असते.यासाठी शिक्षक समतोल विचारांचे,विश्वासार्हता उत्पन्न करणारे, दांडगी इच्छाशक्ती असलेले हवेत.आपल्या विषयावर प्रभूत्व मिळवण्यासाठी विविध तंत्रे वापरणारे हवेत.अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शिक्षण प्रक्रियेकडे सकारात्मकतेने व निस्सीम प्रेमाने बघणारे हवेत.परंपरा व आधुनिकीकरण याचा मिलाप करून शिक्षक अध्यापनाला पर्यायाने संपूर्ण शाळेला दिशा देतो.यातून सुविचारी व सुजाण विद्यार्थी घडतात.ज्यांच्या हाती देशाच्या भविष्याचे दोर आहेत.असे विद्यार्थी घडवणे. हेच आपल्या शाळेचे उद्दिष्ट आहे.
भारतीय संस्कृतीत मेंदीचे महत्त्व वैज्ञानिक पातळीवर जसे आहे तसेच भावनिक पातळीवर देखील आहे. शुभप्रसंगी हळद कुंकवाप्रमाणे मेंदी रेखाटनाला पण महत्वाचे स्थान आहे. आपल्या या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या आईच्या हातावर मेंदी काढतात. आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या हातांवर मेंदी काढून जणू ते मातृऋण मान्य करतात. महाराष्ट्रात नागपंचमीला हातावर मेंदी काढणे ही परंपरा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मातृप्रेमाचा तरल भाव अधोरेखित होतो
नदी आणि त्यातील जीवसृष्टी याचा अभ्यास पाठ्यपुस्तकातून होतोच. पण शालेय पातळीवर प्रत्यक्ष कृती होणे अधिक महत्त्वाचे आहे. जर झाडे, हवा, पाणी, नदी या प्रति विद्यार्थी सजग झाला तरच देशाचं भविष्य उज्वल आहे असं मानता येईल. म्हणूनच ‘नदी स्वच्छता अभियान’ सारखे उपक्रम आपल्या शाळेत आवर्जून होतात.
पर्यावरणातील विविध घटकांप्रती जाणीव आणि जागृती होण्यासाठी शाळेत पर्यावरण मंडळाची स्थापना केली गेली. या अंतर्गत ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती केली जाते. छोटी रोपे तयार केली जातात. शाळेत विविध कार्यक्रमात हीच रोपे पाहुण्यांना भेट दिली जातात. ‘पर्सिस्टंट सिस्टीम्स’ सारख्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खतांचे आणि त्याच्या प्रक्रियेचे सादरीकरण प्रकल्प रूपाने केले आहे. ओला व सुका कचरा याचे संकलन, व्यवस्थापन व त्यातून पर्यावरणाचे संतुलन या सर्वांचा अभ्यास व प्रात्यक्षिक विद्यार्थी स्वयंप्रेरणेने करतात.
ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री राजीव तांबे यांच्या हस्ते शाळेत साहित्य मंडळाचे उदघाटन झाले. आठवड्यातून एकदा या मंडळातील विद्यार्थी भेटतात. नव्या-जुन्या पुस्तकांवर चर्चा, वाचन-लेखन, प्रदर्शन असे उपक्रम साहित्य मंडळामार्फत चालू असतात. रसास्वाद कसा घ्यावा, शब्दकोड्याविषयी माहिती असे पूरक उपक्रमही याच अंतर्गत होतात. यासाठी निवृत्त जेष्ठ शिक्षिका माननीय वीणाताई पाटणकर मार्गदर्शन करतात. शाळेतील भाषा शिक्षक या उपक्रमाचे नियोजन करतात.
प्रथम सत्र परीक्षा संपली की दिवाळी सुट्टीचे वेध लागतात. त्या सुट्टीच्या आधी हा उपक्रम असतो. आश्विन चांदण्यातील दिवाळी सहभोजन मुलांसाठी सुंदर अनुभव असतो. शेवटच्या पेपरच्या दिवशी संध्याकाळी विद्यार्थी छान नवे कपडे घालून शाळेत येतात. गटागटाने पणत्या रंगवणे, ग्रीटिंग करणे, भेटकार्ड करणे, आकाश कंदील तयार करणे सुरू असते. काही गट खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सक्रिय असतात कारण आजचे संध्याकाळचे सहभोजन शाळेतच तयार केले जाते. एकीकडे मुलांसाठी योग्य असा चित्रपट देखील चालू असतो. मुले त्यात रमलेली असतात. चित्रपट संपला की सर्व विद्यार्थी रांगा करून बाहेर पडतात. परिसरातील मोकळ्या रस्त्यांवर अश्विन महिन्यातील आकाशातील चांदण्या बघत, गप्पा मारत फेरफटका होतो. मग सर्वांनी मिळून तयार केलेल्या जेवणावर ताव मारत शिक्षकांच्या पाया पडून, एकमेकांना शुभेच्छा देऊन मुले आनंदात घरी जातात. इतर ठिकाणी साजरी केली जाणारी दिवाळी पार्टी नव्हे तर मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या मराठी शाळेतील अश्विन चांदण्यातील दिवाळी सहभोजन आहे. परस्परांविषयी स्नेहभाव वाढवणारा, कलांचा आस्वाद देणारा, रुचीपूर्ण आनंद देणारा एक उत्सवच!
शालेय पातळीवर सर्व विद्यार्थी कार्यानुभव विषयांतर्गत राखी शाळेतच स्वतः तयार करतात. यानंतर शाळेच्या परिसरातील गृहसंकुलांमध्ये घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांना राखी सप्रेम भेट देऊन संवाद साधतात. शालेय परिसरात राहणारे सर्व नागरिक एक प्रकारे या विद्यार्थ्यांचे सुरक्षा कवच आहे. मग त्यांचे आभार मानणे हे या उमलत्या पिढीचं कर्तव्य आहे या भावनेतून या उपक्रमाची आखणी केली गेली.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी सैध्दांतिक अभ्यासाबरोबर प्रकल्प व प्रयोगाची जोड असावी लागते. चर्चासत्र, नवनवीन विज्ञान शाखांची ओळख, तज्ञ संशोधकांशी संवाद, इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) सारख्या संस्थांना भेट यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रंदावतात. निसर्गतः विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिज्ञासा यामुळे वाढीस लागते. वर्षभरात सातत्याने केलेल्या प्रयोग व प्रकल्पातून उत्तम व नेटके प्रकल्प विज्ञान दिनाला आयोजित विज्ञान प्रदर्शनात मांडले जातात. शाळेच्या स्नेहीवर्गातर्फे रोबोटिक्स सारख्या तंत्रविज्ञान शाखेची तीस दिवसाची कार्यशाळा घेतली जाते. तर्कशुध्द विचार व तंत्रशुध्द मांडणी याची पायाभरणी करणे हा यामागील विचार.
९८२२७६९५३५
३४/९/१ + १०/१, प्रतिज्ञा मंगल कार्यालय जवळ, कर्वेनगर, पुणे ४११०५२
‘अभिजात एज्युकेशन सोसायटी’ ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली सार्वजनिक सेवाभावी संस्था आहे.