आमचा दृष्टीकोन

पूर्व-प्राथमिक विभाग हसरी मुले - उमलती मने

आमचा दृष्टीकोन

प्राथमिक विभाग अभ्यासाचे कसले ओझे - शिक्षकच सवंगडी माझे

आमचा दृष्टीकोन

माध्यमिक विभाग सहिष्णू संस्कार, निधर्मी आचार! शिक्षणच आहे, याचा मूलाधार!

अभिजात एज्युकेशन सोसायटी ही शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे. विकास पंचक ही या सर्वांगीण विकासाची प्रमुख अंगे आहेत. या विकास पंचकाला अनुसरून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपली संस्था प्रयत्न करते.

बौद्धिक विकास

शिक्षण म्हटले की प्रथम विद्यार्थ्याचा बौद्धिक विकासाच लक्षात येतो आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये 80 टक्के कृती बौद्धिक विकासाशी निगडित असतात त्यामुळे अर्थातच अभिजात एज्युकेशन सोसायटी बौद्धिक विकासाला महत्त्व देते.
खरंतर मूल जन्मल्यापासूनच त्याचा बौद्धिक विकास सुरू झालेला असतो बालकाला जसजसे नवे नवे अनुभव मिळतात तस तशी या नवीन अनुभवातून मिळणाऱ्या नवीन ज्ञानाची सांगड त्याचा जुन्या अनुभवाशी घातली जाते आणि पूर्वानुभव अधिकाधिक दृढ होत जातात. हे अनुभव जितके समृद्ध होतील तितका बुद्धीचा विकास परिपूर्ण होत जातो. प्रत्येकाला आयुष्यात हे अनुभव येतच असतात. मात्र ते वेगवेगळे असू शकतात. समान अनुभव घेण्याची सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी शाळा हे माध्यम उपयुक्त ठरते. शालेय अभ्यासक्रमातून होणाऱ्या बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचे कुतूहल जागृत करणे निरीक्षण करण्याची संधी देणे, तर्क लढवणे आणि अनुमान काढणे यासाठी संधी उपलब्ध करणे या बाबींवर भर देण्याचा संस्था प्रयत्न करते.

शारीरिक विकास

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ या उक्ती प्रमाणे सुदृढ शरीर ही निकोप मनाची गरज आहे. खरे तर शारीरिक विकास व्यवस्थित झाला की बौद्धिक आणि मानसिक विकास होण्यासाठी मदत होते. 18 वयोगट शरीराची योग्य वाढ आणि विकास यासाठी समर्पित असतो.‌ शरीर सुदृढ असेल तर मूल नवीन अनुभव आनंदाने आत्मसात करायला उत्सुक असते आणि उद्युक्त होते. शारीरिक विकासासाठी निरोगी प्रकृती आणि शरीराचे योग्य ते पालन पोषण होणे गरजेचे आहे. पालकांना आणि मुलांना याबाबत जागृत करावे लागते. योग्य सवयी आणि नियमितपणा अंगी बांधण्यासाठी प्रोत्साहित करावे लागते. ज्ञानेन्द्रियांचा योग्य विकास व वापर, हस्त-नेत्र-पद समन्वयाचे कौशल्य, काटकपणा, कणखरपणा आणि स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता शारीरिक विकासातून निर्माण होते. शारीरिक विकास होण्यासाठी मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात, भरपूर सूर्यप्रकाशात मुलांना जितकं राहता येईल तितक्या संधी उपलब्ध करून देण्यात संस्था प्रयत्नशील असते.

मानसिक विकास

शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीर निरोगी असेल तर मनही निरोगी राहते आणि निरोगी-निकोप मन हे आनंदाचे झाड आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बाहेरील अनंत भुरळ घालणाऱ्या वस्तू आणि घटनांमध्ये मनाचा स्वास्थ्य सांभाळणं हे प्रत्येक व्यक्तीला अवघड होते. लहानपणापासूनच जर बालकांचा मनाचा विचार केला गेला, त्याच्या भावनांना योग्य वाट मिळाली, आपल्या प्रमाणेच इतरांनाही भावभावना आहेत व त्यांची ती योग्य ती कदर आपण करायला हवी; ही मनाची बैठक तयार झाली, तर कोणत्याही प्रसंगी सर्वंकष विचार करण्याची ताकद मुलांमध्ये लहानपणापासूनच निर्माण होते. आपल्या भावभावनांबाबत सजग करणे, या भावभावनांना संतुलित ठेवणे गरजेचे आहे; याची जाणीव करून देणे, मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी सोपे उपाय सुचवणे, मनमोकळे बोलण्याची मोकळीक आणि ऐकणारा कान उपलब्ध करून देणे या सर्वातून विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होतो. मुलांचे मनोधैर्य वाढवणे कोणत्याही गोष्टीची अकारण वाटणारी भीती घालवणे इतरांवर येणाऱ्या अडचणींची सह अनुभूती घेणे याही गोष्टींसाठी तसे वातावरण निर्माण करणे हे मानसिक विकासासाठी गरजेचे आहे.

सामाजिक विकास

सामाजिकता हा मनुष्याचा अविभाज्य घटक आहे. व्यक्तीच्या वाढ आणि विकासात सामाजिक विकास हा महत्त्व पूर्ण ठरतो. मानसिक विकास जर उत्तम झालेला असेल, तर त्या व्यक्तीचा सामाजिक विकासही वेगाने होतो व तो संतुलितही असतो. व्यक्ती स्वतःबरोबरच समष्टीचा विचार करायला सामाजिक विकासातून शिकते. परिसरातील इतर व्यक्ती, निसर्गातील प्राणी, पक्षी आणि संसाधने याबाबत विद्यार्थी कसा विचार करतो, त्यांच्याबरोबर कसा वागतो हे त्या व्यक्तीच्या सामाजिक विकासावर अवलंबून असते. मूल जेव्हा बालवाडीत प्रवेश घेते, तेव्हाच त्याची नाळ समाजाशी घट्ट बांधली जायला सुरुवात होते. वर्गातील समवयस्क मुलांशी समायोजन करणे, एकमेकांच्या अडचणीला धावून जाणे, कोणत्याही खेळात हारजीत होतच असते हे लक्षात घेऊन इतरांच्या यशाचेही कौतुक करणे, हा सामाजिक विकासाचा पायाच असतो. दुसऱ्याच्या मतांचा आदर, आपल्या हक्कांबरोबरच आपल्यावरील जबाबदाऱ्यांची जाणीव आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती चेतना ही लोकशाहीची तत्वे सामाजिक विकासामुळे व्यक्ती अंगी बाणू शकते. विविध सण उत्सव यांचे आयोजन, पाहुण्यांचे आतिथ्य, मोठ्यांचा आदर असे संस्कारही सामाजिक विकासामुळे व्यक्तीमध्ये रुजतात. आपले घर, आपली शाळा, आपले शहर आणि पुढे जाऊन आपला देश हा आपलेपणा निर्माण होणे हा सामाजिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे.

अभिव्यक्ती विकास

एखादी गोष्ट किंवा घटना अनुभवली, की त्याचे मनावर उठणारे तरंग व्यक्तीने इतरांना दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे अभिव्यक्ती. प्रभावी संप्रेषण, चित्रकला, शिल्पकला, गायन, वादन, नाट्य, अभिनय ही अभिव्यक्तीची वेगवेगळी माध्यमे आहेत. बडबड गीत म्हणणे व, जोश पूर्ण कविता सादर करणे, भावगीतातून भाव व्यक्त करणे, चित्रांमधून भावभावना दर्शविणे, वक्तृत्वातून आपले विचार इतरांवर ठसवणे किंवा योग्य त्या चढ-उताऱ्यासह एखाद्या धड्याचे वाचन करणं किंवा एखाद्या प्रसंगाचा नाटकीकरण करणारी अभिव्यक्ती विकासाची निरनिराळी अंगे आहेत. नवनिर्मिती आणि अभिव्यक्ती यांचा घनिष्ठ संबंध आहे. वेगवेगळ्या माध्यमाद्वारे नवनिर्मितीचा आनंद घेत इतरांपर्यंत आपले विचार पोहोचवता येणे अभिव्यक्ती विकासामुळे शक्य होते यामुळेच अभिव्यक्ती विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.