पूर्व प्राथमिक विभाग

पूर्व प्राथमिक विभाग पुनर्वसु बालक मंदिर

मृदुला धोंगडे

पूर्व प्राथमिक विभाग

अडीच तीन वर्षाची चिमुकली आईचा हात धरून पुनर्वसु बालक मंदिरात आली, की बालशाळेतले तीन तास या सर्वांची आई होऊन आमच्या शिक्षिका सांभाळ करतात. पहिल्या दिवशी आईला ‘ अच्छा ‘ म्हणताना रडणारे किंवा भेदरलेले बालक पहिल्या महिन्याभरातच हसत हसत शाळेत यायला लागले, की जग जिंकल्याचा आनंद आणि अभिमान शिक्षिकेच्या चेहऱ्यावर दिसतो. हीच मुले मग दुसऱ्या सत्रात सुट्टीच्या दिवशी सुद्धा शाळेत चल म्हणून आईकडे हट्ट धरतात. फक्त घर आणि घरातल्या माणसांची ओळख असलेल्या बालकांच्या इतर मोठ्या व्यक्ती आणि समवयस्क बालकांबरोबर आंतरक्रिया सुरू होतात त्या आमच्या बालशाळेत. कधी आपले तर कधी इतरांचे ऐकावे लागते, आपल्याला हवे असलेले खेळणे मित्र-मैत्रिणींना सुद्धा द्यायला लागते, याची जाणीव करून देण्यापासून, सूक्ष्म स्नायू विकासासाठी वेगवेगळे खेळ साहित्य उपलब्ध करून देणे, हस्त नेत्र समन्वय आणि ज्ञानेंद्रियांचा विकास होण्यासाठी मी निराळ्या अनुभव घेण्याच्या संधी उपलब्ध करून देणे, हे सारे पुनर्वसु बालक मंदिर मध्ये जागरूकपणे होते.

बालकांशी गप्पा मारणे, परिसरातील गोष्टींची जाणीव करून देणे, गणिती संकल्पना मनात रुजवणे, वेगवेगळ्या गमतीच्या प्रयोगातून विज्ञानाच्या संकल्पनांची ओळख करून देणे, बालकांचे कुतूहल जागृत करणे, बालकांची वाचनपूर्व आणि लेखनपूर्व तयारी करून घेताना हा सगळा अभ्यास न वाटता, वेगवेगळ्या गंमत कृतीतून मुळाक्षरांची ओळख करून देणे, याचबरोबर दुसरी भाषा इंग्लिश हिची तोंड ओळख करून देणे, या साऱ्या जबाबदाऱ्या पुनर्वसु बालक मंदिर मधील शिक्षिका लीलया सांभाळतात.

रोजच्या कामांचे संगणकीकरण, संगणकाच्या मदतीने शैक्षणिक साहित्य बनवणे आणि कृतिपत्रिका तयार करणे यातही पूर्व प्राथमिक विभाग अग्रेसर आहे.

आमचे उपक्रम

पालक शाळा

पालक शाळेत पालक मुले बनून एक दिवस मुलांची शाळा अनुभवतात. यामुळे त्यांना मुलांच्या पातळीवर येऊन मुलांना समजून कसे घ्यावे हे कळते. मुलांना कोणते साहित्य शाळेत दिले जाते आणि त्याचे फायदे काय किंवा त्याची आवश्यकता काय याबाबत माहिती होते. शाळेत जसे निरनिराळे अनुभव बालकाला दिले जातात तसे पालक बालकाला घरीही अनुभव देऊ शकतील आणि बालकाच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल हा पालक शाळेचा मूळ हेतू आहे.

वसंत पंचमी आणि मातृ पूजन

वसंतपंचमीला छोटी मुले शाळेत आईला वंदन करून, तिचे आशीर्वाद घेतात. आईच्या बरोबर बसून पाटी -पेन्सिल हातात घेऊन लेखनाचा श्री गणेशा करतात. मोठ्यांचा आदर करण्याचा संस्कार, आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना आपोआप मुलांवर होतो. वसंत पंचमी हा सरस्वती पूजनाचा दिवस. मुलांना पुस्तकांचे महत्त्व समजावे यासाठी या दिवशी छोटी ग्रंथदिंडी ही काढली जाते.

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलनात प्रत्येक बालकाला रंगमंचावर जायची संधी उपलब्ध करून दिली जाते. रंगमंचावर अनेक लोकांसमोर न बावरता उभे राहणे, बरोबरच्या मुलांबरोबर नृत्यकला सादर करणे, गाणे म्हणणे आणि नाटुकल्यातली आपली वाक्य बोलणे हा या छोट्या मुलांसाठी मोठा पराक्रमच असतो. थोडीशी शिस्त आणि भरपूर मस्ती असलेला हा उपक्रम पालक शिक्षक आणि बालक तिघांचाही लाडका आहे.

गंमत जत्रा

शाळेतल्या खेळांपेक्षा वेगळे खेळ, मेहंदी, टाटू आणि खाऊची रेलचेल हे सारे गंमत जत्रेत असते. मुलांनी शाळेत यावे, दंगामस्ती करावी आणि मुलांनी पालकांबरोबर एक दिवस आनंदात घालवावा हा या गंमतजत्रेचा मुख्य उद्देश. याच दिवशी नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश खुले होतात. त्यामुळे नव्याने शाळेचे पालक होणाऱ्यांना शाळेची अनौपचारिक ओळख होण्यास मदत होते.

नाटुकली

परिसरातील आणि बालकाच्या दैनंदिन जीवनातील फळे, फुले, प्राणी, पक्षी, वाहने अशा वेगवेगळ्या विषयांच्या आधारे शिक्षिका बालकांना परिसराची माहिती आणि अनुभव घेऊ देतात. याच विषयातील वस्तू शिक्षकांनी लिहिलेल्या नाटुकल्यात पात्रे बनवून बालकासमोर येतात. अन्नघटकांचा, फळांचा उपयोग, फुलांचे वेगवेगळे रंग, एकमेकांना मदत करावी-भांडू नये ही शिकवण अशा अनेक गोष्टी नाटुकल्यातून बालकांना कळतात. गोष्ट, त्यातील पात्रांचे संवाद, हावभाव, भावना ह्याचे शिक्षक सादरीकरण करतात आणि बालके अनुकरण करतात. अभिव्यक्ती विकासाची सुरुवात बालशाळेतील नाटुकल्यांपासून होते.

क्षेत्रभेटी

रोजच्या जीवनात आपल्याला समाजातील अनेक मदतनीस मदत करत असतात. त्यांची ओळख व्हावी त्यांचे काम कळावे, या हेतूने फुलवाल्यांचे-फळवाल्यांचे दुकान, पिठाची गिरणी, फुलझाडांची नर्सरी, कोपऱ्यावरचा चांभार अशा चालत जाण्यासारख्या ठिकाणी बालशाळेतील मुले भेट देतात. रस्त्याने जाताना वाहतुकीचे आणि पादचाऱ्यांचे नियम पाळतात. या सर्व मदतनिसांशी त्यांच्या कामाविषयी आणि त्याच्या साहित्याविषयी गप्पा मारतात. त्यांच्या कामाचे निरीक्षण करतात आणि खूप नवीन गोष्टी प्रत्यक्ष बघून शाळेत येतात. येताना या मदतनीसांना धन्यवाद द्यायला विसरत नाहीत.